गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून अनेक धक्कादायक प्रकार सध्या उघडकीस येत आहे. लातूर शहरात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पृथ्वीराज देशमुख, धवल देशमुख, प्रथमेश रेड्डी आणि आदित्य भालके या चार जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव माधव उर्फ नितीन संगमे (वय 32) असे आहे.या घटनेमुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधव उर्फ नितीन संगमे याचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता.याच संशयातून कन्हेरी चौक परिसरातून नितीनचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला बीड जिल्ह्यातील बर्दापूर येथील खडी केंद्रावर नेण्यात आले.
तेथे आरोपींनी नितीनला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. गंभीर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनैतिक संबंधाच्या संशयातून एवढे टोकाचे पाऊल का उचलण्यात आले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
तसेच या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास लातूर पोलीस करत असून, आरोपींची चौकशी आणि घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.