राज्यात सध्या अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या १७ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात या घटनेंन एकाच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , अंजू विष्णू कडू ही तरुणी मागील आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र, दोन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना फोनवरून देण्यात आली. या घटनेनंतर अंजूच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले असून, तिचा मृत्यू घातपातामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अंजू प्रियकरासोबत बाहेर गेल्यानंतर काही काळाने तिची प्रकृती खालावली. मात्र, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तिच्या शेजारी अघोरी प्रकार करण्यात वेळ घालवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रकृती गंभीर असताना योग्य उपचार मिळाले असते, तर अंजूचा जीव वाचला असता, असा दावा तिच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
अंजूच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी या प्रकरणात संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली. तिचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा आरोप करत, तिच्या प्रियकरासह या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनादरम्यान घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन आणि नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानंतर उपलब्ध पुरावे आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणातील तपास अहवाल आणि वैद्यकीय निष्कर्षांकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, अंजूच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा उलगडा पोलिसांच्या तपासातून होणार आहे.