नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- मनी लॉण्डरिंगच्या केसमध्ये अटक करण्याचा धाक दाखवून एका इसमाला 42 लाख 60 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरी होते. त्यावेळी त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉईस कॉल व व्हिडिओ कॉल आला. त्यावर बोलणार्या अज्ञात व्यक्तींनी आम्ही मुंबई पोलिसांमधून बोलत असल्याचे भासवले.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला तुम्ही मनी लॉण्डरिंगच्या केसमध्ये सहभागी असल्याचे सांगितले. त्या केसमध्ये फिर्यादीला अटक करण्याचा धाक दाखवला.
त्यानंतर या केसच्या तपासाच्या नावाखाली फिर्यादी यांना एकूण 42 लाख 60 हजार 434 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत.