शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात पोलिसांनी केलेल्या एका कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे कापूस आणि तुरीची शेती सुरू असल्याचं दिसत असताना, या पिकांच्या आड वेगळाच प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत केलेल्या कारवाईत धक्कादायक वास्तव समोर आलं.
शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या गांजा शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चक्क कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 330 किलो गांजासह सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 82 लाख 50 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
शिरपूर तालुक्यातील चिलारे, पोस्ट सुळे परिसरातील अतिदुर्गम भागात वनविभागाच्या जमिनीवर ही बेकायदेशील गांजा शेती सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. संशयित आरोपी शिलदार पावरा आणि दीपक पावरा यांनी कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये कॅनाबिस वनस्पती म्हणजेच गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचे पोलिसांनी सांगितले. शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.
या कारवाईदरम्यान 42 वर्षीय दीपक पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांची चाहूल लागताच दुसरा संशयित शिलदार पावरा हा घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. दरम्यान घटनास्थळावरून सुमारे 330 किलो वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याची किंमत 25 हजार रुपये प्रति किलो, म्हणजेच एकूण 82 लाख 50 हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या गांजा शेतीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.