काल सर्वत्र रक्षाबंधनाचा बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण सर्वत्र साजरा झाला . परंतु याच सणाच्या दिवशी एका तरुणाने आपल्या बहिणीला एक भावूक संदेश देऊन स्वतःचे आयुष्य संपविले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना जळगाव शहरातील जुना आसोदा रोड परिसरात घडली. आयुष्याचा शेवट करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर बहिणीसाठी ‘आता सगळं सांभाळून घे दीदी. मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, जातो मी’ असा भावनिक संदेश अपलोड केला होता. रोहित साहेबराव धनगर असं जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
रोहित हा एमआयडीसीतील सिद्धीविनायक विद्यालयात अकरावी कला शाखेत शिक्षण घेत होता. आई-वडील आणि बहिणीसोबत तो राहत होता. त्याचे वडील एमआयडीसी परिसरात मजुरी करतात. शुक्रवारी रक्षाबंधन असल्याने रोहितची आई चोपडा तालुक्यातील असली येथे भावाला राखी बांधण्यासाठी गेली होती. तर वडील रोहित आणि त्याच्या लहान बहिणीला सोबत घेऊन मेहरुण येथील बहिणीकडे राखी बांधण्यासाठी आणि जेवणासाठी गेले होते.
बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर रोहितने वडिलांची गाडी घेऊन ‘घरी जाऊन येतो’ असं सांगितलं आणि तो जुना आसोदा रोडवरील घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने आपल्या ‘रोहित किंग’ या सोशल मीडिया अकाऊंटवर बहिणीसोबतचा फोटो पोस्ट केला. त्यावर ‘हॅपी रक्षाबंधन’ लिहित त्याने बहिणीला ‘आता सगळं तू सांभाळून घे दीदी’ असा संदेश दिला. तसेच मम्मी-पप्पाला कधीही एकटं सोडू नको, ‘मी जातो आहे’ असा निरोपही त्याने दिला.
दरम्यान, रोहितने एका मित्राला व्हिडीओ पाठवून ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये खात्यातून ३० हजार रुपये काढण्यासाठी पिन कोड टाकल्याचेही त्याने सांगितल्याची समोर आले आहे. सोमवारी घरी येणाऱ्या व्यक्तीला हे पैसे देण्याचा निरोप त्याने मित्राला दिला होता. याशिवाय त्याने सोशल मीडियावर आणखी एक स्टेटस ठेवले होते. त्यातील आशयातूनही त्याच्या मनात काहीतरी सुरू असल्याचे स्पष्ट होत होते.
रोहितने टाकलेले मेसेज आणि स्टेटस मित्रांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना संशय आला. काही मित्रांनी तातडीने त्याच्या घरी धाव घेतली. मित्र घरी पोहोचले असता रोहितने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मित्रांनी तत्काळ त्याच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी रोहितला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीला भावनिक निरोप देऊन रोहितने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रोहितचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळगावी वर्डी (ता. चोपडा) येथे नेण्यात आला. दरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी रोहितने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.