‘त्या’ दरोड्याचा मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात; समृद्धी महामार्ग प्रकरणात बीड कनेक्शन उघड
‘त्या’ दरोड्याचा मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात; समृद्धी महामार्ग प्रकरणात बीड कनेक्शन उघड
img
Nandini khandare More
सध्या दरोडा, चोरी अशा घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून आता समृद्धी महामार्गावर देखील अनेक दरोड्याच्या घटना  घडत असूनआता काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर पंक्चर करून प्रवाशांना धमकावून टोळीने लुटलं. या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,, दरोडेखोरांच्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी बीड जिल्ह्यातून अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. किरण अजिनाथ गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 छत्रपती संभाजीनगरमधील अ‍ॅड श्रीकांत मिश्रा आपल्या कुटुंबियांसह समृद्धीवरून मुंबईच्या दिशेने जात होते. यादरम्यान सिन्नर परिसरात रात्री पावणेबाराच्या सुमारास गाडीवर काहीतरी लोखंडी वस्तु आदळली आणि त्यांची गाडी पंक्चर झाली. हीच वेळ साधत १० ते १२ जणांच्या टोळक्यांनी त्यांना धमकावलं आणि त्यांच्याजवळ असलेल्या किमती वस्तू लुटल्या.

या घटनेत दरोडेखोरांनी मिश्रा कुटुंबियांकडून तब्बल १८ लाखांचा ऐवज लुटला. यामध्ये ५ सोन्याच्या अंगठ्या, २ सोन्याचे ब्रेसलेट, २ सोन्याच्या चैन, २ सोन्याच्या बांगड्या, २ पाटल्या, २ घड्याळ, १ मंगळसूत्र, ८५ हजारांची रोख रक्कम इत्यादी वस्तू होत्या. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मिश्रा कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला वेग दिला. पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला. तसेच विविध ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपासादरम्यान या दरोड्याच्या कटामागे किरण अजिनाथ गायकवाड याचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर पोलिसांनी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा परिसरात कारवाई करत गायकवाडला जेरबंद केले. त्याच्याकडून दरोड्याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून, त्याच्या चौकशीतून टोळीतील इतर सदस्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या टोळीतील इतर साथीदारांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. दरोडेखोरांनी आणखी किती ठिकाणी अशाच पद्धतीने प्रवाशांना लक्ष्य केले आहे, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुख्य सूत्रधाराच्या अटकेमुळे समृद्धी महामार्गावरील दरोड्यांच्या घटनांचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group