खळबळजनक ! ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे तरुणाचा तडफडून मृत्यू
खळबळजनक ! ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे तरुणाचा तडफडून मृत्यू
img
Nandini khandare More
ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे एका तरुणाचा तडफडून मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या मालाडमध्ये कुरार व्हिलेज परिसरातून ही घटना समोर आली आहे.  

२० वर्षीय अमन सोनी या तरुणाचा मृत्यू झाला. अमनला त्याच्या काही मित्रांनी घरातून बोलावून अप्पापाडा येथील बीएमसी गार्डनमध्ये नेले आणि तेथे त्याला ड्रग्जचे अनेक इंजेक्शन दिल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अमनच्या चार मित्रांना ताब्यात घेतले.

अमनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अमनला क्रांतीनगर परिसरात राहणारे काही मित्र घरातून घेऊन गेले होते. त्यानंतर त्याला अप्पापाडा येथील बीएमसी गार्डनमध्ये नेण्यात आले. तेथे अमनला ड्रग्जचे अनेक इंजेक्शन देण्यात आले. अमनची प्रकृती बिघडल्यानंतरही त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी त्याला वेळीच वैद्यकीय मदत दिली नाही. जर त्याला वेळीच रुग्णालयात नेले असते तर त्याचे प्राण वाचले असते.

या घटनेशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारा एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये अमन नशेच्या अवस्थेत तडफडताना आणि त्याच्या आसपास काही तरुण असल्याचे दिसत आहे. मात्र, या व्हिडिओतील नेमके तथ्य आणि त्याची सत्यता पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अमन यापूर्वी ड्रग्जच्या आहारी गेला होता. मात्र, मित्रांसोबत झालेल्या वादानंतर त्याने काही काळ नशा सोडली होती.

काही महिन्यांनंतर त्याचे मित्र पुन्हा त्याला सोबत घेऊन गेल्याचा आणि त्यानंतर ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यावेळी त्याच्याच मित्रांनी त्याला ड्रग्जचे इंजेक्शन दिले. अमनची प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले अन्य तरुणही नशेच्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुरार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी अमनच्या मित्रांना ताब्यात घेतलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर अमनच्या मृत्यूमागचे नेमके कारण समोर येईल.

दरम्यान, अप्पापाडा येथील बीएमसी गार्डनमध्ये फॉरेन्सिक पथकाने तपास केला. घटनास्थळावर नशेशी संबंधित काही साहित्य तसेच रिकाम्या इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांकडून या साहित्याची तपासणी केली जात आहे. अमनला गार्डनमध्ये नेमके कोण घेऊन गेले?, त्याला कोणत्या प्रकारचे ड्रग्ज देण्यात आले?, इंजेक्शन कोणी दिले आणि त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात का नेण्यात आले नाही? याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच गार्डन परिसरात यापूर्वीपासून ड्रग्जचा वापर सुरू होता का? याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group