पाच कोटींची खंडणी मागून जमीन मालकास ठार मारण्याची धमकी, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
पाच कोटींची खंडणी मागून जमीन मालकास ठार मारण्याची धमकी, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जागेवर बेकायदेशीर कब्जा करून ती जागा खाली करण्यासाठी पाच कोटी रुपयांची खंडणी मागून जमिनीच्या मालकास जिवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या एका महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी श्रीकांत मधुकर कुलकर्णी (रा. समर्थनगर, कॉलेज रोड, नाशिक) यांची नाशिक येथील धात्रक फाटा, के. के. वाघ अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजसमोर, सर्व्हे नंबर २४०/१ ही ८६२५ चौरस मीटर ही जागा आहे. आरोपी लता भिका बर्डे (रा. दत्तात्रयनगर, अमृतधाम, पंचवटी), सद्दाम बाबू शेख (रा. दत्तात्रयनगर, अमृतधाम) व राजाराम केशव गटकळ (रा. मातेरेवाडी, ता. दिंडोरी) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या जागेवर सन २००३ व २०२४ ची बनावट कागदपत्रे तयार करून त्याचा वापर करून जागेवर बेकायदेशीररीत्या कब्जा घेतला, तसेच या जागेवर देवांच्या मूर्ती ठेवून जागा खाली करण्यासाठी फिर्यादीकडे पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

त्यानुसार या सर्व आरोपींनी फिर्यादीकडून एक लाख रुपये घेतले, तसेच उर्वरित पैसे न देता जागेवर परत आल्यास फिर्यादी व त्याच्या कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी महिलेसह तिघा आरोपींनी दिली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध खंडणीसह धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वावळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group