नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-रात्रीच्या अंधारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी खात्मा करत एक मोठी दुर्घटना टळली आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी 'डायल ११२' च्या माहितीवरून सापळा रचून तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे केवळ दरोड्याचा कटच उधळला गेला नाही, तर चेहडी भागातील एका घरफोडीच्या गुन्ह्याचाही यशस्वी उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि घातक हत्यारे जप्त केली आहेत.
सहाय्यक आयुक्त अद्विती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाशिकरोड परिसरात १ सप्टेंबर रोजी रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक हद्दीत गस्तीवर असताना, 'डायल ११२' वरून विहितगाव येथील पाटील नर्सरी पुलाजवळ ५ ते ६ संशयित हत्यारांसह फिरत असल्याची बातमी मिळाली. डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची गाडी दिसताच झाडीचा फायदा घेऊन पळणाऱ्या ६ पैकी ३ जणांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. गोरख मोहन सावंत (वय २१, रा. चेहडी सांगवी रोड), अक्षय संजय दवणे (वय २१, रा. गोरेवाडी, नाशिकरोड), विठ्ठल अशोकसिंग परदेशी (वय २३, रा. एकलहरे रोड) अशी आरोपींची नावे आहेत. तर पळून गेलेल्या आकाश श्रीवंत, नवनाथ शिंदे आणि अमोल शिरसाठ यांचा शोध सुरू आहे. आरोपींच्या अंगझडतीत धारदार कोयता, चाकू, लोखंडी करवत, कटावणी, दोरी आणि मिरची पूड असा दरोड्याचा ऐवज मिळून आला.
आरोपींवर गुन्हा दाखल करून पोलीस कोठडी घेण्यात आली. तपासादरम्यान आरोपी अक्षय दवणे व गोरख सावंत यांनी ४ ऑगस्ट रोजी चेहडी येथील म्हाडा सोसायटीत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी गेलेले ७०,००० रुपये किमतीचे ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, भुवनेश्वर घनदाट, सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक राहुल काकडे, सतीश आहेर आणि गुन्हे शोध पथकाचे हवालदार विशाल पाटील, नितीन भामरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, पानसरे, विशाल कुंवर, समाधान वाजे, अजय देशमुख, दिपक दिवटे, अरूण गाडेकर, रोहीत शिंदे, योगेश रानडे, गोकुळ कासार, तसेच रेल्वेस्टेशन मार्शलचे अमंलदार नागरे व उगले यांनी पार पाडली.