नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मालेगाव स्टॅण्डजवळ चारचाकी वाहनात कुजलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मालेगाव स्टॅण्ड येथील सीपी टॉवरजवळ एम.एच.15 जीआर 8974 या क्रमांकाच्या गाडीतून उग्रवास येत असल्याने नागरिकांनी गाडीजवळ जाऊन पाहिले असता गाडीत एका इसमाचा मृतदेह दिसून आला. तत्काळ पंचवटी पोलिसांना याबाबत त्यांनी माहिती दिली.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रहिवासी असलेल्या पवार नामक इसमाचा हा मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून गाडीत मृतदेह असल्याने हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे या इसमाच्या शरीरावर कोणत्याही खुणा दिसून आलेल्या नव्हत्या. ही गाडी त्याने भाडेतत्वावर घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा गाडी आतून लॉक होती. त्या इसमाच्या खिशातच गाडीच्या चाव्या मिळाल्या. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. फॉरेन्सीकची टीम देखील दाखल झाली होती. या इसमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ही आत्महत्या आहे की घातपात हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.