मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील खरीप हंगाम २०२६ मधील परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळाच्या यादीत आणखी ४० तालुक्यांचा समावेश करत राज्य शासनाने राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. यासंदर्भात मदत व पुनर्वसन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज जाहीर केलेल्या दुष्काळाच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड आणि त्र्यंबकेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश झाला आहे. याआधी मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा या दहा तालुक्यांचा समावेश झाला आहे. तर दिंडोरी आणि नाशिक तालुक्याचा या दुष्काळाच्या यादीत समावेश झालेला नसून, त्यांचा देखील या यादीत समावेश करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील एकूण १५ पैकी १३ तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.
नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक मिळून एकूण ५२ तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला आहे. ५ ऑक्टोबर २०२६ नंतर राज्यातील पावसाळा अधिकृतपणे समाप्त झाला आहे. पर्जन्याची तूट आणि इतर घटकांच्या आधारे ‘Trigger-१’ (प्रथम कळ) आणि ‘Trigger-२’ (दुसरी कळ) या निकषांनुसार राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.