६ मे २०२६
कुख्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे नाशिक पोलीस एका गर्भवती महिलेसमोर हतबल झाले आहेत का? असा सवाल आता विचारला जात आहे. टीसीएसमधील धर्मांतर आणि ॲट्रॉसिटी प्रकरणातील संशयित निदा खान गेल्या ४५ दिवसांपासून 'नॉट रिचेबल' आहे. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला असला, तरी एसआयटीच्या हाती अद्याप केवळ रिकामे हातच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिक येथील बहुराष्ट्रीय नामांकित टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धर्मांतराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील संशयित निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, निदा गेल्या महिनाभरापासून फरारी असून, विशेष तपास पथकाच्याही हाती अद्याप ती लागू शकलेली नाही.
टीसीएस आयटी कंपनीतील पीडित महिलेवरील अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा देवळाली कॅम्प पोलिसांत दाखल आहे. या प्रकरणातील संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार या दोघांना अटक असून, सध्या ते मुंबई नाका पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात ‘एसआयटी’च्या ताब्यात आहेत. तर, संशयित निदा खान फरारी आहे. या प्रकरणात निदाने अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड सत्र न्यायालयात केला होता; परंतु सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी प्रभावी युक्तिवाद करीत, निदाचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला असून, तिच्या सखोल चौकशीशिवाय तपासाला गती मिळणार नसल्याचे सांगत तिच्या अटकेची मागणी केली. बचाव पक्षाचे वकील राहुल कासलीवाल यांनी यास जोरदार विरोध केला होता. नाशिक रोड सत्र न्यायालयाचे न्या. केदार जोशी यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करीत फेटाळून लावला होता. त्यामुळे निदाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिचा अटकपूर्व अर्ज दाखल झाल्यावर त्यावरील सुनावणीकडे लक्ष आहे.
नाशिक पोलिस दिड महिन्यांपासून निदाच्या मागावर
गर्भवती असलेली निदा खान हिचा दीड महिन्यापासून नाशिक पोलिसांचे ‘एसआयटी’चे पथक शोध घेत आहे; परंतु अद्यापही तिचा थांगपत्ता पथकाला लागू शकलेला नाही. एरवी कुख्यात वा सराईत गुन्हेगारांना अटक करणाऱ्या पोलिसांच्या हाती निदा लागत नसल्याने मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
Copyright ©2026 Bhramar