नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड परिसरातील मालधक्का रोडवर गुंडाविरोधी पथकाने मध्यरात्री धडक कारवाई करत गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. बेकायदेशीर शस्त्र विक्रीसाठी जमलेल्या संशयितांवर कारवाई करत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एकूण पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (४ जुलै) रोजी मध्यरात्री १.३३ वाजण्याच्या सुमारास मालधक्का रोडवरील एचपी गॅस गोडाऊन शेजारील मोकळ्या जागेत काही तरुण संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस शिपाई राकेश राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान गोविंदा संजय साबळे (रा. भोरमळा, ओढा रोड) हा सिद्धांत सचिन धनेधर (रा. चव्हाण मळा, जय भवानी रोड), सोहिल फिरोज शेख (रा. रेल्वे कॉलनी, सिन्नर फाटा) आणि अनिकेत उर्फ केरला यांना गावठी कट्टा विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. अंगझडतीदरम्यान पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचा स्टील बॉडीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि १ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्राथमिक चौकशीत हा कट्टा मनोज डोगळे याच्याकडून विकत घेतल्याची कबुली गोविंदा साबळे याने दिली. याप्रकरणी गोविंदा साबळे, सिद्धांत धनेधर, सोहिल शेख, अनिकेत उर्फ केरला आणि मनोज डोगळे यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार भामरे करीत आहेत.