अभिनेत्रीचा ट्रेनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! तिकिटावरून वाद, RPF जवानावर ब्लेडने हल्ला
अभिनेत्रीचा ट्रेनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! तिकिटावरून वाद, RPF जवानावर ब्लेडने हल्ला
img
Nandini khandare More

रेल्वे तिकिटावरुन एका अभिनेत्रीने मोठा गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. इतकंच नवे तर या अभिनेत्रीने ! RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. मॉडल आणि गाजलेल्या वेब सीरिजमध्ये  झळकलेली अभिनेत्री अंतरा बॅनर्जी ( सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तर, तिनं केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे तिला अटकही करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , आरक्षित जागेवरून झालेल्या वादादरम्यान तिनं स्वतःचे कपडे काढले आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका अधिकाऱ्यावर रेझर ब्लेडनं हल्ला केला, असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना 12 ऑगस्टच्या रात्री घडली, जेव्हा अंतरा एका वेब सीरिजच्या शुटिंगसाठी वांद्रे-गंगानगर अरावली एक्सप्रेसनं सुरतला जात होती.

अभिनेत्री अंतरा बॅनर्जी एका शूटिंगसाठी सुरतला जात होती, तिच्याकडे केवळ 'स्लीपर क्लास'चं तिकीट असतानाही ती आरक्षित 'एसी' (AC) डब्यात शिरली होती. ही घटना बोरीवली आणि डहाणू दरम्यान रात्री 9.30 ते 10.50 च्या सुमारास घडली. एफआयआरनुसार (FIR), एका प्रवाशाने बॅनर्जीला ती आरक्षित जागा रिकामी करण्यास सांगितलं. तिनं नकार दिल्यावर, त्या प्रवाशानं टीसी हरिकेश त्रिपाठी आणि आरपीएफला याची माहिती दिली. 

RPF चे सहाय्यक उपनिरीक्षक यामिनीकांत मिश्रा यांनी सांगितलं की, त्यांनी आणि कॉन्स्टेबल राजेश कुमार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण अंतरा बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन केलं आणि त्यानंतर त्या आक्रमक झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर त्यांनी स्वतःचे कपडे काढले, ब्लेड बाहेर काढलं आणि मिश्रा तसेच स्वतःलाही जखमी केलं. मिश्रा यांचा आरोप आहे की, अभिनेत्रीनं त्यांचा गणवेश आणि मोबाईल फोनचेही नुकसान केलं.

परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून आरपीएफच्या जवानांनी एसी कोचचे दरवाजे बंद केले. डहाणू रेल्वे स्थानकावर खाली उतरवून सरकारी रेल्वे पोलिसांच्या (GRP) ताब्यात देण्यापूर्वी, अंतरा बॅनर्जी यांनी पळून जाण्यासाठी खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे. ही घटना एका तासाहून अधिक काळ चालली, ज्यामुळे रेल्वे कोचमध्ये उपस्थित प्रवाशांमध्येही भितीचं वातावरण पसरलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी, बोरीवली रेल्वे पोलिसांनी बॅनर्जी यांना ताब्यात घेतलं. बोरीवली जीआरपीच्या (GRP) निरीक्षक कुंदा गावडे यांनी सांगितलं की, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, AC डब्याचं तिकीट न मिळाल्यामुळे त्या कदाचित अस्वस्थ किंवा संतापलेल्या असाव्यात. जेव्हा त्यांना नातेवाईकांशी किंवा वकिलाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं, तेव्हा बॅनर्जी यांनी तसं करण्यास नकार दिला आणि स्वतःला अटक करण्याची मागणी केली. बोरीवली जीआरपी निरीक्षक गावडे म्हणाल्या की, "एफआयआर (FIR) नोंदवल्यानंतर त्या शांत झाल्या..."

13 ऑगस्ट रोजी नोंदवण्यात आलेल्या FIR मध्ये बॅनर्जी यांना आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आलं. सुरक्षितता धोक्यात आणणं, सरकारी कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत पोहोचवणं, हल्ला करणं आणि जाणीवपूर्वक अपमान करणं या आरोपांखाली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group