राज्यात दुष्काळ पडला असून महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी केंद्रात राज्यातील सद्यस्थती मांडली असून त्या अनुषंगाने दुष्काळ पाहणी करण्यासाठी पथक धाडावे अशी विनंती केली . दरम्यान आज राज्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
अखेर केंद्राचे दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठीचे पथक मुंबईमध्ये दाखल झालं आहे. राज्याचे मुख्यसचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक सुरू झाली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थितीची माहिती मुख्यसचिवांकडून अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या पथकामध्ये एकून 33 जणांचा समावेश आहे.
11 सदस्यांचे 3 पथकं करण्यात आले असून, एक पथक दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात जाणार आहे. दुसरे पथक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्याची पाहणी करणार आहे. तर तिसरे पथक विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे.