नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-उपनगर नाका सिग्नलवर कंटेनर ट्रकने ज्युपिटर मोपेडला धडक दिल्याने ६४ वर्षीय निवृत्त लष्करी कर्मचारी संजय मालोजीराव घार्गे यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. घार्गे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घार्गे हे शिखरेवाडी परिसरात एकटे राहत होते. लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते पेन्शनधारक होते. त्यांची मुलगी डॉ. अंकीता घार्गे या डॉक्टर असून, उपनगर परिसरातील शुश्रूशा हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची देखरेख घार्गे करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ते घरातून हॉस्पिटलच्या दिशेने ज्युपिटरवरून निघाले होते.
सकाळी साडेनऊच्या सुमारास ते नाशिक-पुणे महामार्गाने उपनगर नाका सिग्नलवरून जात असताना नाशिकरोडकडून द्वारकेच्या दिशेने जाणाऱ्या अशोक लेलँड कंटेनर ट्रकने त्यांच्या मोपेडला धडक दिली. या धडकेत घार्गे रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून घार्गे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मुलगी डॉ. अंकीता यांना पोलिसांनी फोन करून अपघाताची माहिती दिल्यानंतर त्या तातडीने जिल्हा रुग्णालयात पोहोचल्या.
या प्रकरणी डॉ. अंकीता घार्गे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी कंटेनर चालक प्रदीप विठ्ठल चव्हाण (२४, रा. पांगरी खुर्द, ता. मंठा, जि. जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चालकाने वाहन भरधाव वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत घार्गे यांच्या मोपेडला धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक निरीक्षक वायकर करीत आहेत.