अत्यंत निर्दयी ! 9 महिन्याच्या बाळाचे ओठ फेविक्विकने  चिकटवले ! काकूचं विकृत कृत्य
अत्यंत निर्दयी ! 9 महिन्याच्या बाळाचे ओठ फेविक्विकने चिकटवले ! काकूचं विकृत कृत्य
img
Nandini khandare More
पुण्यातील लोहगाव परिसरातून मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळावर अमानुष अत्याचार झाल्याचा आरोप असून, बाळाच्या ओठांना फेविक्विक लावून चिकटवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बाळाच्या काकूवर गंभीर आरोप करण्यात आले असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

घरगुती भांडणाचा राग एका निष्पाप 9 महिन्यांच्या बाळावर काढत भावजयीने त्याच्या तोंडात घातक 'फेव्हीक्विक' टाकल्याची अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव परिसरात घडली आहे. फेव्हिक्विकमुळे चिमुकल्याच्या तोंडाला गंभीर जखमा झाल्या असून त्याला तातडीने ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

अल्ताप नबी शेख (वय 39 , रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहगाव पोलीस ठाण्यात सानिया शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव), रियाज इमाम हाल्याळ (वय 48, रा. कांदिवली, मुंबई) आणि हाजी मलंग शेख (रा. कांदिवली, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्ताप शेख आणि त्यांचा भाऊ हे लोहगावमधील कलवड वस्ती येथे एकाच घरात एकत्र राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात घरगुती कारणांवरून वाद सुरू होते. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून 31 जुलै 2026 रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास अल्ताप शेख यांची भावजय सानिया शेख हिने अल्ताप यांच्या 9 महिन्यांचा मुलगा 'अली' च्या तोंडात फेव्हीक्विक ओतले.

काही वेळाने बाळाला अचानक उलट्या होऊ लागल्या आणि त्याचे ओठ एकमेकांना चिकटल्याचे आई जैनाब शेख यांच्या निदर्शनास आले. बाळाच्या तोंडात जखमा झाल्याचे पाहून आई घाबरली. त्यांनी तातडीने पती अल्ताप यांना फोन करून माहिती दिली. कुटुंबीयांनी बाळाला लागलीच ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवले, जिथे त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. सुदैवाने, वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारामुळे बाळाची तब्येत आता सुधारत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांनी दिली आहे.

चिमुकल्याच्या आई-वडिलांना धमकी
घटनेनंतर चिमुकल्याची आई जैनाब शेख यांनी सानिया शेख हिला याबाबत विचारणा केली असता, तिने याबाबत कोणाला सांगितले तर सोडणार नाही, अशी थेट धमकी दिली. इतकेच नव्हे तर, सानियाचे नातेवाईक रियाज हाल्याळ आणि हाजीमलंग शेख यांनी रुग्णालयात येऊन, मुलगा व्यवस्थित आहे तरीही मुद्दाम सानियाविरुद्ध तक्रार दिली तर तुला दाखवून देतो, अशी धमकी जैनाब यांना दिली.

फेव्हीक्विकमध्ये 'सायनोएक्रिलेट' हे मुख्य रासायनिक घटक असते. यामध्ये एथिल सायनोएक्रिलेट, स्टेबलाइजर्स आणि घट्टपणा वाढवणारी रसायने असतात. हे रसायन हवेशी किंवा त्वचेशी संपर्क येतातच अत्यंत वेगाने घट्ट होते. लहान बाळाच्या संवेदनशील त्वचेवर आणि तोंडात हे केमिकल गेल्याने त्याला गंभीर इजा झाली. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group