रामकुंड परिसरात पाच पर्यटक बुडाले !  चौघांना वाचविण्यात यश; एकाची प्रकृती गंभीर
रामकुंड परिसरात पाच पर्यटक बुडाले ! चौघांना वाचविण्यात यश; एकाची प्रकृती गंभीर
img
Nandini khandare More
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- रामकुंड परिसरातील चक्रधर स्वामी मंदिराजवळ गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील पर्यटकांच्या गटातील पाच जण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. पाच जणांपैकी चौघांना वाचविण्यात यश आले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच गंगेवरील जीवरक्षक दल, तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यातील एका पर्यटकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती असून, त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे रामकुंड परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.



प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा
गोदावरी नदीपात्रात पाण्याची खोली ठिकठिकाणी वेगवेगळी आहे. तसेच काही ठिकाणी पाण्याचा प्रवाहही अधिक असल्याने पर्यटकांनी केवळ उत्साहाच्या भरात नदीपात्रात उतरणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न घेता पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रशासन आणि जीवरक्षक दलाकडून करण्यात आले आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीपात्रातील परिस्थिती अचानक बदलू शकते. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group