सध्या राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या कारवाई करण्यात येत असून भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांच्या आणि अस्वच्छता ठेवणाऱ्या आस्थापनांचे धाबे दणाणले असून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवत आहे. आज 24 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 2 कोटी 25 लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, चार अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईत नागपूरमध्ये तब्बल 55 हजार 996 किलो भाजलेल्या सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 2 कोटी 23 लाख 98 हजार 400 रुपये आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, राज्यभरात एकूण 37 हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी 31 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर 4 आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईतील AYUB’S, फोर्ट, मेसर्स संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, कुर्ला, तसेच नागपूरमधील बुर्हामपूर जलेबी सेंटर आणि स्टेप इन रेस्टॉरंच यांचा समावेश आहे