सर्वसामान्यांना आता साखरेचा गोडवा कडू लागणार आहे कारण आता साखरेच्या दरात अवाक करणारी वाढ झाली असून आता साखरेचे सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असून, किरकोळ बाजारात साखरेचे भाव इतिहासात पहिल्यांदाच ₹६५ प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर देशांतर्गत बाजारात गहू आणि कांद्याच्या दरांनीही मोठी उसळी घेतली आहे. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने स्टॉक मर्यादेचा नवा नियम लागू केला आहे.
१५ दिवसांत किलोमागे १५ रुपयांची वाढ पंधरा दिवसांपूर्वी ₹४८ ते ₹५० प्रति किलो असणारी साखर थेट ₹६५ वर पोहोचली आहे. घाऊक बाजारातही पहिल्यांदाच साखरेने ₹६० चा टप्पा ओलांडला आहे. साखर कारखान्यांनी नफा वाढवण्यासाठी उसापासून साखर तयार करण्याऐवजी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले. परिणामी, साखरेच्या उत्पादनात सुमारे ५% घट नोंदवली गेली आहे. गणेशोत्सव, रक्षाबंधन आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईसाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. कच्च्या मालाचा खर्च २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्याने मिठाई व्यावसायिकांचे गणित कोलमडले आहे.
स्टॉक लिमिट' लागू सणासुदीच्या काळात साखरेचा कृत्रिम तुटवडा आणि भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. दरमहा १० मेट्रिक टनपेक्षा जास्त साखरेचा वापर करणाऱ्या मोठ्या डीलर्स, बिस्कीट आणि कन्फेक्शनरी कंपन्यांवर मर्यादा घालण्यात आली आहे. हे व्यापारी आता १५ दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा करू शकणार नाहीत. हा नवा नियम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरात लागू राहील. इंधन, गहू आणि कांद्याचे भावही भडकले अमेरिका आणि इराणमधील तणाव तसेच 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' परिसरातील अनिश्चिततेमुळे ब्रेंट क्रूड $९२ प्रति बॅरल आणि WTI क्रूड $८५ प्रति बॅरलच्या पार गेले आहे. भारत ८५% तेल आयात करत असल्याने देशांतर्गत वाहतूक खर्च वाढण्याची भीती आहे. रशिया-युक्रेन वादामुळे 'ब्लॅक सी' भागातून होणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. जागतिक बाजारात गव्हाचे भाव $६.७ प्रति बुशेलवर पोहोचले असून, भारतीय बाजारात एका महिन्यात गव्हाचे दर ४ टक्क्यांनी वाढले आहेत. याचा थेट परिणाम पिठ आणि ब्रेडच्या किमतींवर होणार आहे.