राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार काम करणाऱ्या मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांना वार्षिक मानधन देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मतदार नोंदणी प्रक्रियेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
६ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, नियमित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (ERO) दरवर्षी ३० हजार रुपये, तर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (AERO) २५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. हे मानधन १ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आले आहे. मतदार याद्या अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी ERO आणि AERO यांच्यावर असते. राज्यात सध्या २८८ ERO आणि १,७६२ AERO नियमितपणे कार्यरत आहेत.
दरम्यान, SIR-2026 अंतर्गत मतदार याद्यांची विशेष सखोल पडताळणी सुरू आहे. या मोहिमेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियमित पदांव्यतिरिक्त ३,५२७ अतिरिक्त AERO पदे अधिसूचित केली आहेत. या अतिरिक्त पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्यांच्या कार्यकाळापुरते मानधन देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे शिक्षक अधिकाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांच्या आधारे हा निर्णय घेतला असून, त्यामुळे SIR-2026 च्या कामात सहभागी अतिरिक्त AERO अधिकाऱ्यांनाही मानधनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.