राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु असून ठाकरे गटातील नेत्यांचा राजीनामा आणि पक्षांतराचे सत्र सुरूच असून आत अपुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरेंच्या विश्वासू महिला नेत्याने राजीनामा दिला आहे.सध्या कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर राणे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
वैशाली दरेकर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे हे उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता याच वैशाली दरेकर यांनी आपल्या जिल्हा महिला संघटक पदाचा राजीनामा दिला आहे.
वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा वैयक्तिक कारणांमुळे देत असल्याचे सांगितले आहे. माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी वेळ देऊ शकत नाहीये, असंही त्या म्हणाल्या आहेत. मी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असला तरीही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सदस्या म्हणून कार्यरत राहणार आहे, असं स्पष्टीकरण वैशाली दरेकर यांनी दिले. दरेकर यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्या भविष्यात नेमका काय निर्णय घेणार? त्यांचे आगामी राजकारण नेमके कसे असेल? असेही अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.