गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव काळात डीजेबाबत महत्त्वाचे संकेत देत, उत्सवाचा आनंद आणि परंपरा जपत तो सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजेबाबत नेमका काय निर्णय होणार, याकडे गणेश मंडळांसह पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुण्यामध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीमध्ये ते बोलत होते. डीजेच्या वादात न पडता, सांस्कृतीक पद्धतीने गणेश्वोत्सव साजरा करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणेकर गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करू शकतात, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
''मी जेव्हा या कार्यक्रमातून बाहेर पडेल तेव्हा मीडिया मला पुण्यासंदर्भात एकच प्रश्न विचारणार आहे. तुम्ही गणेशोत्सवाचं बोललात मग गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही? हा प्रश्न मला नक्की विचारला जाणार आहे. पण मी पुणेकरांना सांगू इच्छितो. पुण्यामध्येच ही क्षमता आहे. की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे. हे फक्त पुणेकरच करू शकतात. माझं पुणेकरांना आवाहन आहे, डीजेच्या वादात न पडता, पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण सास्कृतीक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा होतो?'' असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.