यायचं असेल तर... ! दोन्ही  राष्ट्रवादीच्या  विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले ?
यायचं असेल तर... ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले ?
img
Nandini khandare More
राज्यातील राजकरणात मोठया हालचालींना सध्या वेग आलेला आहे. याचदरम्यान आता दोन्ही  राष्ट्रवादी विलिनीकरणावरील चर्चाना देखील उधाण आलं आहे. याचदरम्यान आता शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

त्यामुळं दोन्ही गटांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेलं असतानाच, शरद पवार यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. ज्यांना आमच्यासोबत यायचंय, त्यांनी विरोधी पक्षात आमच्यासोबत यावं, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. पवार यांच्या ठाम भूमिकेमुळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं मानलं जात आहे. अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या. 

अजित पवार असताना त्यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका झाल्या होत्या, असं शरद पवार गटाच्या काही नेत्यांकडून सांगितलं गेलं. दोन्ही पक्ष कधीही आणि कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात, अशा चर्चांना पुन्हा बळ मिळालं. त्यात काही दिवसांपूर्वी पार्थ आणि जय पवार हे दोघे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळं विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा डोकं वर काढलं. त्याचवेळी शरद पवारांनी याबाबत ठाम भूमिका मांडली.

तत्पूर्वी, अजित पवार गटाकडून विलीनीकरणाच्या चर्चांना कधीही दुजोरा दिला गेला नाही. अशातच शरद पावर यांच्या खासदारांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांचे पेव फुटले होते. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी देखील चर्चा झाल्याचे सांगत आम्हीही त्या बैठकीला उपस्थित होतो, असे विधान केले होते.

दरम्यानच्या काळात पवार कुटुंबातील विवाह सोहळ्यात देखील पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. यावरून देखील अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर पवार यांनी आतापर्यंत थेट भूमिका किंवा भाष्य केले नव्हते. मात्र, आज पहिल्यांदाच शरद पवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. माझ्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसोबत जाणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतो, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली. ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे त्यांनी विरोधी पक्षात आमच्यासोबत यावं, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group