राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून आता भाजपच्या गोटात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या ३९ नगरसेवकांना थेट नोटीस बजावण्यात आली आहे.
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग साहित्य वाटप शिबिराचे निमंत्रण देऊनही पूर्वसूचना न देता कार्यक्रमाला अनुपस्थित असलेल्या महापालिकेतील भाजपच्या ३९ नगरसेवकांना सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी नोटीस बजावली असून, यावर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. यात २२ पुरुष आणि १७ महिलांचा समावेश असून, काही महिला सभापती, ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश असल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पक्षात शिस्तीला महत्त्व आहे. त्यामुळे कार्यक्रमाला गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांनी समर्पक स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अशा नगरसेवकांची यादी बाल्या बोरकर यांनी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांना पाठविली असून, संबंधितांवर रीतसर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला होता. नागपूरचा हा कार्यक्रम असल्याने ते आदल्या दिवशी रात्री तब्बल दोन वाजता शहरात दाखल झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता थेट भट सभागृहात कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मात्र, खुद्द त्याच शहरात आणि अवघ्या काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या भाजपच्या ३९ नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला पाठ फिरविली. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे किंवा त्यांना भेटण्याचे साधे सौजन्यही या नगरसेवकांनी दाखविले नाही. तर विकास निधी रोखणार? पूर्वसूचना न देता कार्यक्रमाला गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांचा विकास निधी किंवा प्रभागातील निधी रोखला जाणार असल्याची माहिती आहे. स्थायी समितीकडून निधी वितरित करण्यापूर्वी गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांना विचारणा केली जावी. स्पष्टीकरण योग्य नसल्यास संबंधित नगरसेवकांचा निधी रोखला जावा, अशी सूचना सत्तापक्ष नेत्यांनी स्थायी समिती सभापतींना केल्याची माहिती आहे.
ज्येष्ठ नगरसेवक सत्तापक्ष नेत्यांच्या भूमिकेवर नाराज सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यात अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचाह समावेश आहे. यातील अनेकांची सत्तापक्षनेते बाल्या बोरकर यांच्याशी यापूर्वीही खटकली होती. अशा नगरसेवकांची नावेही नोटीस जारी केलेल्यांच्या यादीत आहेत. यातील एका नगरसेवकाने सांगितले की, यापूर्वी कोणत्याही कार्यक्रमाबाबत अशा पद्धतीचा व्यवहार कधीही झाला नव्हता. नोटी जारी करण्याचे कोणतेही औचित्य नव्हते. नगरसेवकांच्या स्वतःच्या वैयक्तिक समस्याही असू शकतात. अशा प्रकारे नोटीस जारी केल्याचा दावा सार्वजनिक करायला नको होता.