सध्या राजकारणात मोठया घडामोडी घडत असून आता ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेतील 16 नगरसेवकांचं पद धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे. या 16 नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्रांना कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वेगळाच आणि धक्कादायक दावा केला आहे. भाजपच्या 27 नगरसेवकांचे आणि शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र वादग्रस्त असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
भाजपच्या 27 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र वादग्रस्त आहे. शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र वादग्रस्त. असं सांगतानाच विशाखा राऊत यांच्यासमोर दुसऱ्या नंबरवर असलेल्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्रही वादग्रस्त आहे. या व्यक्तीने कुडाळ किंवा कोकणातून जातप्रमाणपत्र आणलंय. त्याची सखोल चौकशी केल्यास त्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्रही रद्द होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: जात पडताळणी अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही फोन करत आहेत. याचं वाचवा आणि याचं रद्द करा, असं सांगण्यासाठी मुख्यमंत्री फोन करत आहेत. कुणाचं जात प्रमाणपत्र वैध आणि कुणाचं नाही? हे सांगण्यासाठी मिंधे फोन करत आहेत. राज्यात सध्या या लेव्हलला राजकारण सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली.