मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांसाठी सरकारने घेतला ''हा'' मोठा निर्णय ! काय आहे जाणून घ्या
मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांसाठी सरकारने घेतला ''हा'' मोठा निर्णय ! काय आहे जाणून घ्या
img
Nandini khandare More

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असून मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा आंदोलकांनी अविरत लढा दिलेला आहे. दरम्यान आता आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबातील वारसांसाठी सरकारने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय  दिला आहे. 

आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका सदस्याला MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिक पडताळणी पूर्ण करून पात्र ठरलेल्या मृत व्यक्तींच्या वारसांची यादी जारी करण्यात आली आहे. 

सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बीड जिल्हा प्रशासनाने संबंधित वारसांच्या कागदपत्रांची छाननी केली असून, त्यांना नियुक्ती देण्याबाबत पुढील आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या पोटात अन्न, पाण्याचा एक कण नसल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांनी मराठा समाजासाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या.


दरम्यान कुणबी प्रमाणपत्राबाबत मराठा उपसमितीची महत्त्वाची बैठक सुरु आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक सुरू आहे. बैठकीला मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड उपस्थित आहेत. मराठवाड्यातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. मराठवाड्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित आहेत.

लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव काळे इथं मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. लातूर ते बार्शी रस्ता अडवत आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे. बोरगाव काळे येथे एका मराठा आंदोलकाने उपोषण आंदोलन चालवले आहे, या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group