बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीत मजुरांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. बोटीमध्ये एकूण १८ मजूर होते. गंगेची वाढलेली पाणीपातळी आणि वेगवान प्रवाह असतानाही हे मजूर नदीकाठच्या बंधाऱ्याच्या संरक्षणाच्या कामासाठी जात होते. बोट बुडाल्यानंतर काही मजुरांना वाचवण्यात आले असून बेपत्ता मजुरांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. नौगछिया पोलीस जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील खरिक ब्लॉकमधील राघोपूर पंचायतीच्या हद्दीत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवर एकूण १८ कामगार होते. बोट उलटताच अनेक कामगारांनी पोहून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी १२ जण पोहत सुरक्षितपणे नदीकाठावर पोहोचले. उर्वरित सहा कामगार नदीच्या प्रबळ प्रवाहामुळे वाहून गेले असावेत किंवा ते बेपत्ता झाले असावेत, अशी भीती व्यक्त केली जातेय.
समोर आलेल्या माहितीनुसार , नदीतून प्रवास करताना मजुरांची ही बोट अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि नदीच्या मधोमध उलटली. नौका उलटताच घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळ उडाला.गेल्या काही दिवसांपासून गंगेचा मुख्य प्रवाहात वाढ झालीय. काझिकोराईया-राघोपूर जमीनदारी किनाऱ्यारवरील तटावर प्रचंड दबाव वाढलाय.
किनाऱ्यावरील तट फुटण्यापासून वाचवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या सूचनांनुसार कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणावर पूर-संरक्षणाचे काम केले जातंय. या कामाचा एक भाग म्हणून, भागलपूर जिल्ह्यातील विविध भागांतील मजूर आणि बांधकामाचे साहित्य बोटीतून नदीपलीकडे नेत होते. त्याचवेळी प्रवाहाच्या जोरदार वेगामुळे त्या बोटीचं नियंत्रण गेलं आणि बोट उलटली.
एसडीआरएफचं पथ बेपत्ता मजुरांचा शोध घेत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि एसडीआरएफ (SDRF) चे पथक मोटारबोटी व लाइफ जॅकेट्ससह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंगा नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ पाणबुड्यांच्या मदतीने व्यापकपद्धतीने बचावकार्य सुरू आहे. बोटीमध्ये कंत्राटदार धूप-प्रतिबंधक काम करत होते. त्यात विविध भागांतील मजूर सहभागी होते.