नाशिकमध्ये वाडीवऱ्हे येथे मित्रासोबत जेवायला गेलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती. संबंधित महिला मित्रासोबत एका रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर बाहेर पडत होती मात्र तिच्या मित्राचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली, या धडकेत महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती होती परंतु आता प्रकरणी मोठा उलगडा झाला आहे.
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव शिवारातील ‘हिरवी मिर्ची रिसॉर्ट’जवळ झालेल्या रुपाली निलेश पाटील (वय ३५) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा वाडीवऱ्हे पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. सुरुवातीला अपघाती किंवा आकस्मिक मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत रुपाली यांची हत्याच झाल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी संशयित प्रियकर दीपक शिवाजी सैंदाणे याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक सैंदाणे हा रुपाली पाटील यांना कारमधून फिरण्यासाठी सांजेगाव शिवारात घेऊन जात होता. प्रवासादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने हिरवी मिर्ची रिसॉर्टच्या गेटसमोर रुपाली यांच्या अंगावर कार घालून त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या सखोल चौकशीत आरोपी दीपक याने हत्येची कबुली दिली आहे.
पोलिसांची चक्रे वेगाने फिरली
घटनास्थळाची पाहणी, फॉरेन्सिक पथकाचा तपास, ई-साक्ष आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रुपेश दोंदे व सुरेश एर यांच्या जबाबांवरून आरोपीचा गुन्ह्यातील थेट सहभाग निष्पन्न झाला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात आता BNS कलम १०३(१) (हत्या) अन्वये कलमवाढ करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.