नुकत्याच वाढलेल्या साखरेच्या दरामुळे नागरिक अवाक असतानाच आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. साखरेनंतर आता गुळाचाही भाव वाढला आहे. किरकोळ बाजारात तर साखरेच भाव 80 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. अचानक झालेल्या या भाववाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
नाशिकमधील इगतपुरीत ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर आणि गुळाच्या दरात वाढ झाली आहे. साखरेचा दर ७६ ते ८० रुपये किलो तर गुळाचा दर ७० रुपये किलो झाला आहे.
सध्या ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेशोत्सवाचा काळ आहे. या सणासुदीच्या दिवशी गोडधोड पदार्थ करून खाल्ले जातात. अशा स्थितीत साखर तसेच गुळाचा भाव वाढला आहे. साखर महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
मिठाईच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेच्या दरवाढीचा चहा आणि मिठाईच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात गोड पदार्थ महाग होऊ शकतात.