राज्यभरात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अत्यंत भयावह आणि गंभीर अशा घटना उघडकीस येत आहेत. आता अशीच एक धक्कादायक बातमी वाशीममधून समोर आली आहे. जिल्ह्यातील रिसोड शहरात स्मशानभूमीजवळ उभ्या असलेल्या मॅक्स पिकअप वाहनामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहनातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड शहरातील स्मशानभूमीजवळ एक मॅक्स पिकअप गेल्या काही दिवसांपासून उभा होता. दरम्यान, मंगळवारी या वाहनातून असह्य दुर्गंधी येऊ लागल्याने काही नागरिकांनी वाहनाजवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी वाहनामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचे निदर्शनात आले. हा प्रकार समोर येताच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.
घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह काही दिवसांपासून वाहनात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू अपघाती आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, तसेच मृतदेह पिकअपमध्ये नेमका कसा आणि कुठून आणण्यात आला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासह वाहनाचा मालक, वाहन येथे किती दिवसांपासून उभे होते आणि मृतदेह वाहनात कसा पोहोचला, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे रिसोड शहरात चर्चेला उधाण आले असून, तपासातून या रहस्यमय मृत्यूमागील सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे.