कुख्यात भूषण गोसावीच्या मैत्रिणीचा हवेत गोळीबार; सोशल मीडियासाठी रील बनवणं पडलं महागात
कुख्यात भूषण गोसावीच्या मैत्रिणीचा हवेत गोळीबार; सोशल मीडियासाठी रील बनवणं पडलं महागात
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-
नाशिकरोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पिस्तूल पोटाला लावून लुटमारी करणाऱ्या कुख्यात गुंड भूषण गोसावी याच्या सांगण्यावरून त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीने चक्क हवेत गोळीबार करत रील (व्हिडिओ) तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकरोड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत तरुणीला ताब्यात घेतले असून, बेकायदेशीर पिस्तूल आणि हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात अफरोज खान या नागरिकाच्या पोटाला पिस्तूल लावून १७ हजार रुपये लुटणारा आणि त्यानंतर देवळाली गावात बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव यांच्या मर्सिडीज कारवर गोळीबार व दगडफेक करणारा संशयित आरोपी भूषण गोसावी याचा पोलीस शोध घेत होते. या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला एक गुप्त माहिती मिळाली. भूषण गोसावीची मैत्रीण हिने बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून मौज-मजेसाठी हवेत गोळीबार केला असून, त्याचा व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवला आहे, अशी माहिती दिली. 

माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एकलहरा ट्रॅक्शन रोड परिसरात छापा टाकला. तेथे संशयित तरुणीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, महिला पोलिसांच्या मदतीने तिचा मोबाईल तपासला असता, गॅलरीमधील 'व्हिडिओ' फोल्डरमध्ये ही धक्कादायक चित्रफित पोलिसांच्या हाती लागली.

अधिक चौकशीत तरुणीने गुन्ह्याची कबुली दिली. १४ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथील वैभव हॉटेलमागे, वडाच्या झाडाजवळ भूषण गोसावी याने तिला जिवंत काडतूस भरलेला गावठी कट्टा दिला आणि मौज-मजा म्हणून हवेत गोळीबार करण्यास सांगितले. कोमलने गोळीबार करताना भूषणने तिच्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर भूषण ते पिस्तूल घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित तरुणी आणि भूषण गोसावी यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि व्हिडिओ क्लिप असलेला पेनड्राइव्ह जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत आहेत. शहरात रील बनवण्याच्या नादात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या तरुणाईला या घटनेने मोठा इशारा मिळाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group