महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे . डॉ दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला जामीन मिळाला असून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती मिळालीये. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात आज मंगळवारी सुनावणी झाली.
आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई हायकोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला सुनावलेली जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टातील न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिल्याची माहिती हाती आली आहे.
तर या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन मंजूर केलाय. अंदुरेने वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या माध्यमातून विशेष यूएपीए कोर्टाच्या 10 मे 2024 रोजीच्या निकालाला आव्हान दिलं होतं. त्याने अंतिम निकालापर्यंत जामीन आणि जन्मठेपेला स्थगिती देण्याची मागणी केली होती.