होर्मुज खाडी बंद असल्याने भारताला मोठा फटका बसला. आता इराण आणि अमेरिका या दोन्ही देशातील युद्ध थांबले आहे. काही दिवसांकरिता युद्धविराम करार जाहीर करण्यात आला. अमेरिकेने घोषणा केली की, आम्ही इराणवरील हल्ले थांबवत आहोत. अमेरिका इराणवर मोठे हल्ले करताना दिसली. मात्र, शेवटपर्यंत इराणनेही हार मानली नाही.
यादरम्यानच आता भारतासाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे होर्मुज खाडी असुरक्षित आहे. जहाजांवर मोठे हल्ले केले जात आहेत. आता या परिस्थितीत ओमानने मध्यस्थीची भूमिका म्हणून पुढाकार घेतला. ओमानने मांडलेल्या प्रस्तावाला इराण सकारात्मक प्रतिसाद देत आहे आणि जर त्यांनी याला संमती दिली, तर एक मोठा वाद मिटेल.
या सागरी मार्गाबाबत ओमानने मांडलेल्या प्रस्तावानुसार, या सागरी मार्गावर फक्त इराणचेच नियंत्रण राहणार नाही तर त्याऐवजी दोन्ही देशांचे नियंत्रण राहिल आणि दोन्ही देश मिळून कामकाज बघतील. अशा कोणत्याही व्यवस्थेत आपल्या मित्रराष्ट्रांना प्राधान्य दिले जाईल, असे इराणने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. इराणसोबतचे भारताचे संबंध तणावपूर्ण नसले तरीही भारत आणि ओमानचे संबंध अधिक चांगले आहेत.
ओमान आणि इराणचे होर्मुज खाडीवर नियंत्रण राहिले तर भारताचा थेट फायदा होईल. ही भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. होर्मुज खाडी तेलवाहू जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यात भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी ओमानचेच लष्कर पुढे आले. या युद्धाच्या पार्श्वभूमीत भारताला प्रचंड मदत ओमानने केली. यावरून दोन्ही देशातील संबंध काय आणि कसे आहेत, हे पुढे येते.