पाणी पुरवठ्यावरून सरपंचाला बेदम मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे या मारहाणीमुळे चक्क सरपंचाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना तामिळनाडू येथील आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की , पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांनी सरपंचाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सरपंचाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. पिण्याच्या पाण्याच्या अनियमित पुरवठ्यावरून झालेल्या वादातून ही भयंकर घटना घडली. सरपंच महाराजन यांच्यावर विटां0नी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपी एसाकी पांडियनविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी एसाकी पांडियन हा गेल्या आठवड्यापासून परिसरातील पाणीटंचाईमुळे नाराज होता आणि त्याचा सरपंच महाराजाजन यांच्याशी वाद होता. दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या एसाकी पांडियनने महाराजन यांच्यावर विटेने हल्ला केला. या हल्ल्यात महाराजन गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
सरपंचाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी एसाकी पांडियनला अटक केली. पोलिस पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकारण तापले असून डीएमके खासदार कनिमोझी यांच्यासह विरोधी नेत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली.
डीएमके खासदार कनिमोझी यांनी सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, 'वल्लियूरजवळील कन्ननल्लूर येथे झालेल्या संघर्षादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने पंचायत परिषद अध्यक्ष महाराजाजन यांची दगडफेक करून हत्या केल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. पिण्याच्या पाण्याच्या संकटाविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांशी बोलत असताना सरपंच यांची झालेली हत्या आणि आरोपींचे पलायन यावरून तामिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हे दिसून येते. एआयएडीएमके सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे. याठिकाणी मुलांना, महिलांना आणि अगदी लोकप्रतिनिधींनाही कोणतीही सुरक्षा मिळत नाही.'