Nashik Crime : आधी 48 लाख रुपये व्याज  उकळले; अन्‌‍ डांबून ठेवत पुन्हा मागितली 50 लाख रुपयांची खंडणी
Nashik Crime : आधी 48 लाख रुपये व्याज उकळले; अन्‌‍ डांबून ठेवत पुन्हा मागितली 50 लाख रुपयांची खंडणी
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- वीस लाख रुपयांवर 48 लाख रुपयांचे व्याज उकळूनही कर्जदाराकडे पुन्हा 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन खासगी सावकारांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी सद्दाम बाबू शेख, लता बर्डे (दोघेही रा. अमृतधाम, पंचवटी, नाशिक) व इतरांनी अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करून फिर्यादी विजय पुंडलिक शिरोडे (रा. सनराईज रेसिडेन्सी, अमृतधाम) या मेडिकल व्यावसायिकाकडून 20 लाख रुपयांंवर 48 लाख रुपयांचे व्याज उकळले, तसेच फिर्यादीला अमृतधाम येथील भगवती हॉटेलमध्ये बोलावून घेऊन त्याला मारहाण करून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच शिरोडे यांना जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवून अमृतधाम येथे गोल्ड स्टार कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेऊन चार तास डांबून ठेवले. 

तसेच फिर्यादी शिरोडे यांच्याकडे मुद्दल व व्याज बाकी असल्याचे सांगून आणखी 50 लाख रुपयांची अवैध मागणी केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या पत्नीला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन शिरोडे यांच्या मनात मृत्यूची भीती घालून त्यांच्याकडून सर्व्हे नंबर 261/2 या प्लॉटच्या डेव्हलपमेंट ॲग्रिमेंटवर बळजबरीने सह्या घेतल्या, तसेच फिर्यादीच्या प्लॉटवर आरोपींनी बेकायदेशीर ताबा मिळविला. त्याचप्रमाणे आरोपी लता बर्डे हिने सद्दाम शेख याच्या नावावर प्लॉट करून न दिल्यास ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही फिर्यादीला दिली. हा प्रकार सन 2021 ते दि. 2 सप्टेंबर 2026 या कालावधीत पंचवटीतील अमृतधाम येथे घडला.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सद्दाम शेख, लता बर्डे व इतर खासगी सावकारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यता आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group