नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरातील रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले असून, सातपूर परिसरातील निले कंपनी येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावरील खड्डा आणि चिखलामुळे झालेल्या भीषण अपघातात जेलरोड येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ४२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुजित राजेंद्र गायकवाड (रा. राहुल नगर, पवारवाडी, जेलरोड, नाशिक रोड) असे मृताचे नाव आहे. शहरातील खड्ड्यांमुळे झालेला हा नववा बळी असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, जेलरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित गायकवाड हे आज सकाळी सुमारे ११ वाजता सातपूर येथील निले कंपनी परिसरातून दुचाकीवरून जात होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि खड्डे असल्याने वाहनचालकांची मोठी कसरत सुरू होती. याचवेळी पुढे जाणाऱ्या चारचाकी वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबला. सुजित यांच्या लक्षात येण्यापूर्वीच त्यांच्या दुचाकीची कारला पाठीमागून धडक झाली. या धडकेत ते दुचाकीवरून खाली पडले आणि त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या छोटा हत्ती वाहनाच्या पुढील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर सुजित यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुजित गायकवाड हे जेलरोड परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले युवक म्हणून परिचित होते. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी समजताच मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली. हसतमुख आणि सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारा युवक काळाच्या पडद्याआड गेल्याने जेलरोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ,आणि बारा वर्षांची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या सुजित यांच्या अकाली निधनामुळे पत्नी आणि चिमुकल्या मुलीवर मोठे संकट कोसळले आहे.
दरम्यान, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे यापूर्वीही अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वारंवार आंदोलने, मोर्चे काढून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खड्डे हे केवळ रस्त्यावरील खड्डे नसून ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. एका बाजूला महापालिका प्रशासन विकासकामांचा दावा करते, तर दुसऱ्या बाजूला खराब रस्त्यांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. सुजित गायकवाड यांचा मृत्यू ही केवळ अपघाताची घटना नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षाची गंभीर परिणती आहे, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. आता तरी महापालिका प्रशासन जागे होणार का, की आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.