नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण झाली होती . भोंदू खरातने महिलांची फसवणूक करून त्यांचे शोषण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचे आरोप तसेच अनेक व्हिडीओ समोर आले. दरम्यान, त्यानंतर अशोक खरातला अटक करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या अशोक खरात प्रकरणी आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
या खटल्यासाठी सरकारने अॅड. उज्ज्वल निकमयांची विशेष सरकारी तकील म्हणून जून महिन्यात नियुक्ती केली होती. मात्र त्यांच्याकडे राज्यातील इतर महत्त्वाच्या खटल्यांची जबाबदारी असल्याने अशोक खरात प्रकरणात ते पहिल्यांदाच सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते. मात्र, आरोपीचे वकील अॅड. राहुल कासलीवाल न्यायालयात वेळेवर उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असून, आता पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.
सध्या सेशन कोर्टात असलेल्या 6 खटल्यांपैकी एका खटल्यात जामीन मिळावा, अशी विनंती अशोक खरातने न्यायालयाकडे केली आहे. आपला गुन्हा जामीनपात्र असल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र, सरकारी पक्षाने या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला आहे.
सरकारी पक्षाने न्यायालयात दाखल केलेल्या खुलाशात अशोक खरातला जामीन देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. विविध पीडित महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि त्यांच्या मनात निर्माण करण्यात आलेल्या भीतीच्या वातावरणाबाबत सविस्तर पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आल्याचे सरकारी पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने 16 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
आज जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. अशोक खरातचे वकील काही न्यायालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे आज त्यांचा युक्तिवाद होऊ शकला नाही. मात्र, सरकारी पक्षाचे वकील न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी जामिनाला विरोध करण्यासाठी आपली बाजू मांडली आणि ठोस कारणे तसेच पुरावे न्यायालयासमोर सादर केले. आता 16 सप्टेंबरला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालय निर्णय घेणार आहे.