नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिक रोडजवळील चाडेगाव शिवारात बिबट्याने पाळीव कुत्र्याचा केलेला थरारक पाठलाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, जीव वाचविण्यासाठी कुत्र्याने अर्धवट बांधकाम असलेल्या बंगल्याच्या थेट तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, पायाला मार लागल्याने धावण्याची क्षमता कमी झालेल्या या कुत्र्याला अखेर बिबट्याच्या तावडीतून सुटका करता आली नाही. बिबट्याने त्याची शिकार केली. पहाटेच्या अंधारात घडलेल्या या घटनेने चाडेगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिन्नर फाट्याजवळील चाडेगाव शिवारात शेतकरी शिवाजी देवराम वाघ यांचा बंगला असून, त्यांच्या राहत्या बंगल्यासमोरच अर्धवट बांधकाम सुरू असलेला तीन मजली बंगला आहे. गुरुवारी रात्री वाघ यांच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने घाबरलेला कुत्रा जीव वाचविण्यासाठी समोरील अर्धवट बांधकाम असलेल्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन बसला.
दरम्यान, कुत्र्याच्या वासाचा माग काढत शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्या पुन्हा या परिसरात आला. कुत्रा तिसऱ्या मजल्यावर असल्याचे लक्षात येताच बिबट्याने थेट बंगल्याच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. एकामागून एक पायऱ्या चढत बिबट्या थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. बिबट्या आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून घाबरलेल्या कुत्र्याने जीवाच्या आकांताने थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.
उडी मारल्याने कुत्र्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो काही क्षण असहाय्य झाला. मात्र, बिबट्यानेही हार मानली नाही. तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर बिबट्या पुन्हा त्याच पायऱ्यांनी खाली उतरला आणि जखमी कुत्र्याच्या दिशेने सरकला. बिबट्या जवळ येताच कुत्र्याने पुन्हा जीव वाचविण्यासाठी धाव घेतली; मात्र जखमी अवस्थेत त्याला फार दूर जाता आले नाही. अखेर बिबट्याने त्याला गाठून त्याची शिकार केली.
सकाळी पाळीव कुत्रा परिसरात दिसत नसल्याने वाघ कुटुंबीयांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यावेळी रात्रीपासून पहाटेपर्यंत बिबट्याने कुत्र्याचा केलेला पाठलाग, बिबट्या पायऱ्यांनी तिसऱ्या मजल्यावर चढून जाणे, कुत्र्याने तिसऱ्या मजल्यावरून घेतलेली जीवघेणी उडी आणि त्यानंतर बिबट्याचे पुन्हा पायऱ्यांनी खाली उतरणे, हा संपूर्ण थरारक प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे चाडेगाव शिवारातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.