Nashik Crime :; समृद्धी महामार्गावर  मध्यरात्री  दरोडा ; कुटुंबाला मारहाण करून १८ लाख लंपास
Nashik Crime :; समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडा ; कुटुंबाला मारहाण करून १८ लाख लंपास
img
Nandini khandare More
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी पुन्हा एकदा दहशत माजवली आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात रात्रीच्या वेळी कारचे टायर पंक्चर करून ११ ते १२ जणांच्या टोळीने कुटुंबाला मारहाण करत तब्बल १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनं एकच खळबळ निर्माण झाली आहे.  याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात संशयितांचा शोध सुरू आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथील श्रीकांत राजेंद्रसिंग मिश्रा (३७) हे आपल्या कुटुंबीयांसह कारमधून समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मलढोण शिवारातील समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक ५४२.१ जवळ त्यांच्या कारच्या पुढील चाकासमोर अचानक लोखंडी वस्तू टाकण्यात आली. लोखंडी वस्तूवरून वाहन गेल्याने कारचे टायर फुटले आणि वाहन महामार्गावरच थांबले. कार थांबताच मागून आलेल्या अंदाजे ११ ते १२ अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी श्रीकांत मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धमकावत बळजबरीने त्यांच्या ताब्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या धक्कादायक लुटीत सोन्याच्या अंगठ्या, चैन, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, कुड्या यांसह विविध दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तब्बल १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. घटनेनंतर याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात(Wavi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप अज्ञात आहेत. पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार देविदास माळी आणि शहाजी शिंदे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group