नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकरोड येथील बहुचर्चित सुमीत पगारे हत्याकांडाच्या तपासात नाशिकरोड पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण २१ संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी १२ जणांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित नऊ आरोपी फरार आहेत.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आल्यास संभाव्य टोळीयुद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या सर्व १२ आरोपींची परजिल्ह्यातील कारागृहांत रवानगी करण्यात आली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिसांनी माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत पगारे हत्याप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवित २१ संशयित आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यापैकी १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मृत सुमीत पगारे याचा भाऊ सनी पगारे तसेच त्याचे काही साथीदार सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. याच कारागृहात पिवाल टोळीशी संबंधित आरोपींना ठेवण्यात आल्यास कारागृहातच दोन गटांमध्ये संघर्ष होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे संभाव्य टोळीयुद्ध टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अटक केलेल्या आरोपींची नाशिकरोडऐवजी परजिल्ह्यातील कारागृहांत रवानगी केली.
अटक केलेल्या आरोपींपैकी अर्जुन पिवाल, आशिष पिवाल, मुन्ना गांगुर्डे आणि पराग कुलकर्णी यांना छत्रपती संभाजीनगर कारागृहात, तर राजीफ शेख, निशांत भारती, आयुष भारती, शाहिद शेख, अक्षय गोसावी आणि साद पठाण यांना धुळे कारागृहात पाठविण्यात आले आहे. साहिल शेख याची नंदुरबार कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील शिवा पिवाल, राहुल सोनवणे, राजु शेख, जमीर रंगरेज, रोशन फेल्टे, रोहित नेरे, दर्शन गांगुर्डे, अमजद उर्फ मामु शेख आणि आदिल सय्यद हे नऊ आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत आहेत. फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक करीत आहे.