नाशिकरोड परिसरात बनावट तुपाचा कारखाना उध्वस्त; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
नाशिकरोड परिसरात बनावट तुपाचा कारखाना उध्वस्त; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारा आणखी एक धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरात समोर आला आहे. शिंदेगाव येथील गौतम नगर भागात बेकायदेशीरपणे बनावट तूप तयार करणाऱ्या एका अड्ड्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेगाव येथील गौतम नगर भागातील विजय जाधव यांच्या खोलीत सतिश गिरी (वय २८) हा तरुण भाड्याने राहत होता. या बंद खोलीत मोठ्या प्रमाणावर बनावट तूप तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.

त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. संशयास्पद खोलीचे कुलूप तोडून आत झडती घेतली असता पथकाचे डोळे चक्रावले. खोलीमध्ये स्टेनलेस स्टीलच्या डब्यांमध्ये सुमारे ३५ किलो बनावट तूप आणि १५ किलो सुट्टे वनस्पती फॅट मिळून आले.

संशयित सतिश गिरी हा अस्सल तुपाच्या नावाखाली वनस्पती फॅटची (डालडा) सर्रास भेसळ करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. डब्यातील तयार तुपात साधारण ४ ते ५ किलो वनस्पती फॅट मिसळले जात होते. हे भेसळयुक्त तूप नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रतिक पुरुषोत्तम भड (वय ३०) यांनी याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सतिश गिरी (रा. शिंदेगाव, गौतम नगर, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेले तूप आणि वनस्पती फॅटचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पवार करत आहेत.
इतर बातम्या
गंगापूर धरण

Join Whatsapp Group