नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील गजबजलेल्या बाजारपेठेत बुधवारी पहाटे चोरट्यांनी धाडसी चोरी करत चार ते पाच दुकानांना लक्ष्य केल्याने व्यापारी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
शास्त्री पथ रोडवरील गोरे अँड सन्स आणि जेनरिक मेडिसिन, शाहू महाराज पथवरील नम्रता स्वीट्स, जुने बिटको रुग्णालय परिसरातील पी. के. मेडिकल, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सिल्वनिया केक शॉप या दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी चोरी केली. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिस तपास करत आहेत.
चोरट्यांनी गोरे अँड सन्स येथून सुमारे ६० हजार रुपये, जेनरिक मेडिसिनमधून ३५ हजार रुपये, पी. के. मेडिकलमधून १० हजार रुपये आणि सिल्वनिया केक शॉपमधून ६ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. नम्रता स्वीट्सचेही शटर वाकवण्यात आले; मात्र रोख रक्कम न मिळाल्याने चोरटे तेथून पसार झाले.
ही चोरी पहाटे २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. भर बाजारात अशा प्रकारे चोरीच्या घटना घडत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी ओंकार पॅटीस तोडफोड प्रकरण आणि विराज एक्सक्लुझिव्ह खंडणी प्रकरण ताजे असतानाच पुन्हा झालेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
कोयते, तलवारी आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनाही वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जेनरिक मेडिसिनचे ब्रम्हानंद प्रकाश वानखेडे आणि गोरे अँड सन्सचे राकेश गोरे यांनी घटनेची माहिती दिली.