जुन्या बिटको रुग्णालयाजवळ युवकावर झाडल्या गोळ्या; प्रकृती गंभीर
जुन्या बिटको रुग्णालयाजवळ युवकावर झाडल्या गोळ्या; प्रकृती गंभीर
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील अत्यंत गजबजलेल्या जुन्या बिटको रुग्णालयाच्या परिसरात रविवारी रात्री आठ वाजेच्या  सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.

अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सुमित पगारे नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून, भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या बिटको रुग्णालयाजवळ सुमित पगारे हे उभे असताना अचानक आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या प्राणघातक हल्ल्यात एक गोळी थेट सुमित यांच्या पोटात घुसली, तर दुसरी गोळी त्यांच्या अंगाला चाटून गेली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

रक्तबंबाळ झालेल्या सुमित यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी करत चौकशी सुरू केली आहे.

घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. हा गोळीबार जुन्या वादातून झाला की पूर्ववैमनस्यातून, याचा शोध पोलीस घेत आहेत. संशयितांचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. सुमित याचा भाऊ सनी पगारे हा एमडी ड्रग्ज प्रकरणात नाशिकरोड कारागृहात आहे. 
भरदिवसा मुख्य रस्त्यावर झालेल्या या गोळीबारामुळे नाशिकरोड परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

 घटनास्थळी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे दाखल झाले आहेत. तपासा कमी अनेक पथक रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group