नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक रोड शहरातील विविध भागांना शनिवारी (दि. 8) रात्री सुमारे 10 वाजून 1 मिनिटाच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. अचानक घरातील टीव्ही, बेड, खिडक्या, दरवाजे तसेच अन्य वस्तू हादरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
काही क्षणांसाठी घरच हलत असल्याचा अनुभव आल्याने घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. बिटको चौक, जेल रोड, चंपानगरी, अनुराधा चौक, आर्टिलरी सेंटर तसेच जय भवानी रोड परिसरातील नागरिकांनी जोरदार हादरे जाणवल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नाशिक रोडमधील काही घरांमध्ये टीव्ही हलणे, बेड हादरणे, दरवाजे-खिडक्यांना कंप जाणवणे तसेच घरातील वस्तूंची हालचाल झाल्याचे नागरिकांनी सांगितले. काही नागरिक झोपण्याच्या तयारीत असतानाच अचानक हादरा जाणवल्याने त्यांनी तातडीने घराबाहेर येणे पसंत केले. सोशल मीडियावरही भूकंपाच्या धक्क्याची चर्चा सुरू झाली असून नाशिक रोडच्या विविध भागांत नेमका किती तीव्र धक्का जाणवला, याबाबत नागरिकांकडून माहिती घेतली जात होती.
दरम्यान, या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाची खोली सुमारे 5 किलोमीटर होती. केंद्रबिंदू 20.424 अंश उत्तर अक्षांश आणि 73.682 अंश पूर्व रेखांशावर असल्याचे नोंदवण्यात आले आहे. या धक्क्याची नोंद संबंधित भूकंप निरीक्षण यंत्रणेकडून ‘Reviewed’ करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, 6 ऑगस्ट रोजीही नाशिक जिल्ह्यात 3.0 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. त्या वेळीही भूकंपाची खोली 5 किलोमीटर होती. अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने आता 4.3 रिश्टरचा अधिक तीव्र धक्का बसल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दोन दिवसांपूर्वीच्या धक्क्यापेक्षा शनिवारी रात्रीचा धक्का 1.3 रिश्टरने अधिक तीव्र असल्याने त्याचे कंपन नाशिक रोडच्या विविध भागांमध्ये अधिक जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नाशिक रोड परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने या भूकंपाच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक हादरे जाणवत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सुदैवाने शनिवारी रात्रीच्या धक्क्यात जीवित अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नाशिक जिल्ह्यात यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आले आहेत. विशेषतः दिंडोरी तालुका आणि सुरगाणा तालुक्यातील काही भाग भूकंपाच्या हालचालींच्या दृष्टीने यापूर्वी चर्चेत आले आहेत. आता दोन दिवसांत 3.0 आणि त्यानंतर 4.3 रिश्टरचे धक्के नोंदवले गेल्याने दिंडोरी-सुरगाणा परिसरातील भूकंपाच्या हालचालींकडे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.