नाशिक :आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या मविप्र रुग्णालयात उपचारांचा आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला आहे.
रुग्णालयातील अत्यंत अद्ययावत अशा किडनी ट्रान्सप्लांट युनिटमध्ये पुन्हा एकदा दोन रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असल्याची माहिती ॲड. नितीन ठाकरे व अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी दिली.
मविप्र रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग निष्ठांत व तज्ञ डॉक्टरांसह सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी व कार्यकारणी मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित झाले आहे. मविप्र रुग्णालयात यापूर्वी झालेल्या दोन यशस्वी शस्त्रक्रियांनंतर, नव्याने पार पडलेल्या या दोन्ही जटिल शस्त्रक्रियांमधील रुग्णांची प्रकृती पूर्णपणे सुधारली असून, त्यांना नुकताच सुरक्षितपणे डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या शस्त्रक्रियेमध्ये एका वृद्ध महिला व एका तरुण रुग्णावर अत्यंत बिकट परिस्थितीत यशस्वी उपचार करण्यात आले. वैद्यकीय जगतात किडनी प्रत्यारोपण ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि उच्च कौशल्याची प्रक्रिया मानली जाते. मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण करणे, विषारी घटक बाहेर काढणे आणि द्रवपदार्थांचा समतोल राखणे ही मुख्य कामे किडनी करते. किडनी पूर्णपणे निकामी झाल्यावर रुग्णाला वारंवार डायलिसिस करावे लागते, ज्यावर किडनी ट्रान्सप्लांट हाच एक कायमस्वरूपी व प्रभावी वैद्यकीय पर्याय असतो. मविप्र रुग्णालयात ही अवघड सुविधा आता अद्ययावत स्वरूपात उपलब्ध झाल्याने रुग्णांना मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही.
सर्जरी विभाग प्रमुख डॉ. कैलास मोगल, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र कोडीलकर, उप-वैद्यकीय अधीक्षक मंगेश जाधव तसेच अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांच्या समन्वयातून नेफ्रॉलॉजी, सर्जरी आणि भूलशास्त्र (ॲनेस्थेशिया) या तिन्ही विभागांनी एकत्र येत ही मोहीम फत्ते केली. यामध्ये नेफ्रॉलॉजी विभागाचे डॉ. विपुल गटानी, डॉ. अभिजित मोरे, डॉ. रोहन रघुवंशी, डॉ.पार्थ देवगावकर, सर्जरी विभागाचे डॉ. नंदन विळेकर, डॉ. पुष्पेंद्र सहाणे, डॉ. अभिनव गाडे, डॉ. अभयसिंग वालिया, डॉ. राजेंद्र नेहते, डॉ. प्रणव छाजेड, भूलशास्त्र विभागाचे डॉ. अलका कोशिरे, डॉ. हेमंत पवार, डॉ. प्रमोद, डॉ. पूनम धुर्वे तर नर्सिंग व सपोर्टिंग स्टाफमधून नर्सिंग हेड गोरख बागुल यांच्यासह प्रशिक्षित कर्मचारी वर्गाच्याअहोरात्र मेहनतीमुळे आणि अचूक समन्वयामुळेच ही कठीण शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली. असेही डॉ. सुधीर भामरे यांनी सांगितले.
या यशस्वी कामगिरीबद्दल मविप्र संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी संपूर्ण डॉक्टर टीमचे आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले आहे. मविप्र रुग्णालयातील या यशामुळे नाशिकच्या वैद्यकीय वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
"आडगाव येथील मविप्र रुग्णालयात आता अद्ययावत किडनी प्रत्यारोपण सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली आहे. निष्णात आणि अनुभवी डॉक्टरांची टीम, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, विशेष आयसीयू (ICU) आणि समर्पित सपोर्टिंग स्टाफच्या जोरावर आपण ही किमया साधू शकलो आहोत. मविप्र रुग्णालयाच्या आणि संपूर्ण संस्थेच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद व ऐतिहासिक कामगिरी आहे", असे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले.