नाशिक - नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून महानगरपालिकेच्या विशेष महासभेमध्ये नगरसेवक संतप्त झाले असून सभेला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक थेट ॲम्बुलन्स सह दाखल झाले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापौरांसमोरील मोकळ्या जागेत रुग्णांच्या वेशभूषा करून आंदोलन करण्यात आले. यावर महापौरांनी नगरसेवकांना शांत करत महासभेला सुरुवात केली.
नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे नाशिकवासीय त्रस्त झाले असून यातून काही जणांचे अपघात होऊन काही जण जखमी झाले आहेत तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रश्नावर आज नाशिक महानगरपालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली होती.
या सभेला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक मुकेश शहाणे, गटनेते सीमा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲम्बुलन्स सह सभागृहात रुग्णांची वेशभूषा करत नगरसेवक दाखल झाले. त्यांचे आंदोलन सुरू असताना महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी महासभा सुरू केली तर सभागृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक वैशाली दाणी, भारती ताजनपुरे, शैलेश ढगे, यांच्यासह इतर नगरसेवक रुग्णांची वेशभूषा करून महापौरांच्या आसनासमोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये दाखल झाले.
त्यांनी घोषणाबाजी करत या सर्व प्रश्नावर चर्चा करावी, कारवाई करावी अशी मागणी केली. महापौरांच्या समोर मोकळ्या जागेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक जमा झाल्यानंतर भाजपाचे नगरसेवक अजिंक्य साने, भुषण राणे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, छाया देवांग, यांच्यासह इतर नगरसेवक व्यासपीठावर चढले. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये महापौरांनी शिवसेना नगरसेवकांना शांत करत सर्व प्रश्नांवर चर्चा होणार आहे असे सांगून त्यांना जागेवर बसण्यास सांगितले.
प्रत्यक्ष सभेला पुन्हा या गोंधळानंतर सुरुवात झाली. खड्ड्यांच्या प्रश्नावरून असलेल्या या सभेमध्ये काय निर्णय होतो हे ऐकण्यासाठी नाशिक शहरातील नागरिकांनी देखील प्रेक्षक गॅलरीमध्ये चांगलीच गर्दी केलेली दिसून आली.