श्रावणी सोमवारी त्र्यंबकला जाणाऱ्या भाविकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या
श्रावणी सोमवारी त्र्यंबकला जाणाऱ्या भाविकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या "या" सूचना
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

त्र्यंबकेश्वरकडे जाताना ओव्हरटेकिंग, लेन कटिंग तसेच रस्त्याच्या कडेला वाहन उभे करणे पूर्णपणे टाळावे. रॉंग साईडने वाहन चालवू नये. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत. अनधिकृतपणे अथवा रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करू नयेत.

रांगेत शिस्त पाळा; धक्काबुक्की टाळा

मंदिर दर्शनासाठी अथवा अन्य ठिकाणी रांगेत उभे असताना भाविकांनी शिस्त पाळावी. पुढे जाण्याच्या घाईत समोरील व्यक्तीला धक्का देणे, गर्दीतून जबरदस्तीने पुढे जाणे अथवा कोणत्याही प्रकारची गडबड करणे टाळावे. गर्दीत धक्काबुक्की होणार नाही आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची प्रत्येक भाविकाने दक्षता घ्यावी.

पाणी प्या; प्रकृती बिघडल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधा

गर्दी आणि उन्हाचा विचार करता भाविकांनी स्वतःजवळ पुरेशा पाण्याची व्यवस्था ठेवावी तसेच नियमितपणे पाणी प्यावे. डिहायड्रेशन होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यास त्रास अंगावर न काढता जवळच्या आरोग्य केंद्रात तातडीने जावे आणि वैद्यकीय पथकाशी संपर्क साधावा.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला व लहान मुलांनी शक्य असल्यास गर्दीच्या दिवशी येणे टाळावे

श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे होणारी मोठी गर्दी लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, गरोदर महिला तसेच लहान मुलांनी शक्य असल्यास श्रावण सोमवारच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला येणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. गर्दीच्या दिवशी प्रवास करणे आवश्यक असल्यास संबंधितांनी आपल्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी.

भाविकांनी प्रशासन, पोलीस व वाहतूक यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. वाहतूक नियमांचे पालन, रांगेतील शिस्त, आरोग्याची काळजी आणि प्रशासनास सहकार्य केल्यास संभाव्य अपघातात्मक परिस्थिती तसेच वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल.

त्र्यंबकेश्वर यात्रेचा अनुभव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी व्हावा, यासाठी प्रत्येक भाविकाने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group