पाथर्डी फाट्यावरील
पाथर्डी फाट्यावरील "त्या" खुनाचा उलगडा; पत्नीच निघाली मुख्य आरोपी
img
दैनिक भ्रमर

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इसमाच्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वसंत गोरखनाथ सातपुते (वय 40, रा. स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हे 5 ऑगस्ट पासून बेपत्ता होते. त्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार नजीम खान पठाण व मुक्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की, वसंत सातपुते याचा एका महिलेने काही इसमांच्या मदतीने खून केला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी हसीना शेख, साहिल शहा हे सध्या शालिमार परिसरात असल्याचीही माहिती त्यांना मिळाली होती. ही माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले.

पोलिसांनी शालिमार परिसरातून हसीना हबीब शेख (वय 44, रा. स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा), साहिल रफिक शेख (वय 23, रा. म्हाडा वसाहत, वडाळा गाव), मोईन मुक्तार शहा (वय 24, रा. नाईकवाडीपुरा, भद्रकाली) व सरफराज अपरार सय्यद (वय 22, रा. नानावली, जुने नाशिक) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी वसंत सातपुते हा हसीना शेख व साहिल शहा यांच्या प्रेम संबंधात अडथळा निर्माण करत असल्याने त्याचा दिनांक ६ ऑगस्ट रोजी त्याच्या राहत्या घरी साहिल शहाच्या मदतीने चाकूने गळा चिरून खून केल्याची कबुली हसीना शेखने दिली.

नंतर या दोघांनी मोईन शहा व सरफराज सय्यद यांच्या मदतीने वसंत सातपुतेचा मृतदेह एका गोणीमध्ये भरून ईरटीगा गाडी घेऊन कसारा घाटात तो टाकून दिला. पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत व त्यांच्या टीमने कसारा घाटात मृतदेह फेकून दिलेल्या ठिकाणी जाऊन घनदाट जंगलात मृतदेह शोधून काढला. पुढील कारवाईसाठी हा मृतदेह इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group