नाशिक.:- राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन, नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये "सेफ फुड, सेफ महाराष्ट्र" या मोहिमेअंतर्गत तुकाराम मुंडे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई तसेच मंगेश माने, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभाग व ज्ञानेश्वर महाले, सहायक आयुक्त (अन्न) नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आज कारवाई करण्यात आली.
प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दि. १३ रोजी नाशिक शहरात करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान मे. झेप्टो लिमिटेड, सिडको, नाशिक या ऑनलाईन अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनेच्या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे व अमित रासकर यांनी तपासणी केली असता स्वच्छता व आरोग्य विषयक निकषांचे उल्लंघन आढळून झालेले आहे. स्वच्छता व अन्न सुरक्षा विषयक त्रुटी आढळुन आल्यामुळे व परिशिष्ट ४ चे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनातर्फे सदर आस्थापनेचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणास सर्वोच्च प्राधान्य देत असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसायिकास कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नाशिक विभागात सुरू असलेली विशेष तपासणी मोहीम पुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असून अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता, सुरक्षित अन्न उत्पादन, साठवणूक, हाताळणी व विक्री याबाबत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेब त्याअंतर्गत नियम व विनियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच नागरिकांनीही कोणत्याही अन्नपदार्थाबाबत दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार नोंदवून सुरक्षित अन्न अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्यामार्फत करण्यात आले आहे.